१४ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचा इशारा; पीक विमा न दिल्यास बैलगाडी-ट्रॅक्टरसह मोर्चा

यशश्री अपडेट्स | धाराशिव :

खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा रुपामाता परिवाराचे संस्थापक अॅड. व्यंकट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी मा. किर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, पाडोळी (आ.), जेवळी, धानोरी, मुरुम, अनाळा, शेलगाव, चिखली, पाचपिंपळा, सोनारी, आसू, शिराढोण आणि वाशी या १४ महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्याप पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही केवळ तांत्रिक त्रुटींच्या कारणास्तव नुकसानभरपाईपासून शेतकऱ्यांना दूर ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी विम्यापासून वंचित

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नियमानुसार विमा हप्ता भरला आहे. मात्र, पिकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्याच्या वेळी तांत्रिक अडचणी पुढे करून पात्र शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी केला आहे.

राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातही संबंधित तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या १४ महसूल मंडळांतील सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीप २०२५ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ तातडीने मंजूर करून नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींचे मौन आणि प्रशासनाची उदासीन भूमिका दुर्दैवी असल्याची भावना शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली. हजारो शेतकरी आपल्या हक्काच्या विमा भरपाईसाठी संघर्ष करत असताना त्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. मात्र, अद्याप या प्रश्नावर अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे.

विमा कंपन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांकडून वेळेवर विम्याचा हप्ता स्वीकारणाऱ्या विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याच्या वेळी तांत्रिक कारणे आणि प्रक्रियात्मक अडचणींचा आधार घेऊन जबाबदारी झटकू नये, अशी मागणीही करण्यात आली.

नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना नियम व तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचा कारभार पारदर्शकपणे तपासून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

विमा न दिल्यास बैलगाडी-ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा

दरम्यान, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला नाही, तर १४ महसूल मंडळांतील शेतकरी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अॅड. व्यंकट गुंड पाटील यांनी दिला.

“शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. प्रशासनाने आणि संबंधित पीक विमा कंपन्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा अॅड. गुंड पाटील यांनी दिला.

तसेच, मागणीची तातडीने दखल घेऊन पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधित पीक विमा कंपन्यांची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी प्रतिनिधींची उपस्थिती

यावेळी शेतकरी सेना तालुकाध्यक्ष हनुमंत कदम, धनराज माने, प्रेमनाथ पाटील, सतीश मोटे, निवृत्ती कुदळे, कुमोद मुंडे, ज्ञानेश्वर कदम, अॅड. शरद गुंड, अमोल गुंड, नितीन शेवाळे यांच्यासह १४ महसूल मंडळांतील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता प्रशासन आणि संबंधित विमा कंपन्या या मागणीवर कोणती भूमिका घेतात आणि १४ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना खरीप २०२५ च्या पीक विम्याचा लाभ कधी मिळतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!