धाराशिव | यशश्री अपडेट्स :
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली विशेष मतदार पडताळणी मोहीम (एसआयआर) अखेर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण १४ लाख १३ हजार ८६४ मतदारांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दुबार नोंदी, मृत मतदार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदींची छाननी करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८१ हजार ४७५ मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.
एसआयआर प्रक्रियेत सर्वाधिक मतदारसंख्या घटण्याची शक्यता धाराशिव तालुक्यात असून, तब्बल ५९ हजार १०३ मतदारांची नावे कमी होणार आहेत. त्यानंतर तुळजापूर तालुक्यात ३४ हजार ९६ मतदार, तर उमरगा तालुक्यात २७ हजार १८८ मतदार कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वाशी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे १ हजार ९४१ मतदारांची घट होणार आहे.
जिल्ह्यात ५२ हजारांहून अधिक मतदार मृत
एसआयआरच्या पडताळणीदरम्यान जिल्ह्यातील ५२ हजार ९०६ मतदार मृत असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ८२ हजार ५५७ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे समोर आले आहे. मतदार यादीतील दुबार नोंदी, मृत व्यक्तींची नावे तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नोंदी वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीत जिल्ह्याच्या मतदारसंख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
१२ लाख ३२ हजार मतदारांचे डिजिटायझेशन
एसआयआर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण १२ लाख ३२ हजार ३८९ मतदारांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. तसेच मतदारांच्या नोंदींचे मॅपिंग आणि इतर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात मोहिमेची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याने निवडणूक विभागाला मुदतवाढ द्यावी लागली होती. आठ-आठ दिवसांच्या दोन मुदतवाढीनंतर अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
धाराशिव आणि तुळजापूरमध्ये सर्वाधिक घट
तालुकानिहाय आकडेवारी पाहता धाराशिव तालुक्यात सर्वाधिक ५९,१०३ मतदारांची नावे कमी होणार आहेत. तुळजापूरमध्ये ३४,०९६, उमरग्यात २७,१८८, कळंबमध्ये १७,०१५, परंड्यात १३,६५०, लोहाऱ्यात १०,९११, भूममध्ये १०,२३८, तर वाशी तालुक्यात १,९४१ मतदारांची घट होणार आहे.
२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार, २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत आक्षेप असलेल्या नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर निवडणूक विभागाकडून २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत दावे-हरकतींची छाननी व निकाली काढण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
२७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी
दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अंतिम यादी महत्त्वाची ठरणार असून, त्यानंतर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बदल होणार नाही.
त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव यादीत आहे की नाही, तसेच नाव, पत्ता आणि इतर नोंदी योग्य आहेत की नाहीत, याची तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पात्र मतदाराचे नाव यादीत नसल्यास किंवा चुकीची नोंद आढळल्यास निर्धारित कालावधीत निवडणूक विभागाकडे दावा अथवा हरकत दाखल करता येणार आहे.
पुढील प्रक्रिया :
- २४ ऑगस्ट — प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर — दावे व हरकती स्वीकारणे
- २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर — दावे व हरकती निकाली काढणे
- २७ ऑक्टोबर — अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
एसआयआर मोहिमेमुळे मतदार यादीतील दुबार, मृत आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी कमी होऊन यादी अधिक अचूक करण्याचा निवडणूक विभागाचा प्रयत्न आहे. मात्र, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र मतदारांचे नाव वगळले गेले असल्यास त्यांना दावे-हरकतीची संधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी यादीची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
