यशश्री अपडेट्स | वाशी
वाशी शहरातील दोन गटांतील युवकांमध्ये मंगळवारी (दि. ११) दुपारी झालेल्या तुंबळ हाणामारीत एका नगरसेवकासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी रोडवरील भैरवनाथ शुगरजवळ घडली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांतील युवकांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून लाठ्या, काठ्या आणि इतर वस्तूंचा वापर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या मारामारीत उबाठा गटाचे नगरसेवक दिग्विजय प्रशांत चेडे, बालाजी लहू कवडे, विशाल दिगंबर चेडे आणि अजय बाळासाहेब कुदळे हे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव, बार्शी आणि कळंब येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुग्णालय परिसरात तणाव
मारामारीची माहिती मिळताच दोन्ही गटांतील मोठ्या संख्येने युवक वाशी ग्रामीण रुग्णालयात जमले. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाशी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालय परिसरात दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवत शांतता राखण्याचे आवाहन केले.
दंगल नियंत्रण पथक तैनात
घटनेची माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयाला मिळताच तेथून तातडीने दोन दंगल नियंत्रण पथके वाशीकडे रवाना करण्यात आली. शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातून पथसंचलनही केले. सध्या वाशी शहरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कारण अद्याप अस्पष्ट
या हाणामारीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून घटनेची सखोल तपासणी केली जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तेरखेडा घटनेनंतर पुन्हा तणाव
मागील काही दिवसांपूर्वी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे आधीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क होते. वाशीतील ताज्या घटनेनंतर वेळीच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
या घटनेमुळे वाशी शहरात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
