यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव भाजपमधील जुने-नवे नेतृत्व यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र होत असून, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांच्या योगदानावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड आणि ज्येष्ठ पदाधिकारी विनोद गपाट यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. पाटील परिवाराने पराभवाच्या भीतीतून आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांनी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून, “निष्ठेचा दावा करणाऱ्यांनी मागील ३० वर्षांत पक्ष संघटन उभारणीसाठी आणि भाजपच्या वाढीसाठी नेमके काय योगदान दिले, याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण द्यावे,” असे आव्हान दिले होते. त्यावर उत्तर देताना विनोद गपाट आणि ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्ह्यातील भाजप-शिवसेना युतीच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली.
विजयाचे श्रेय कोणाचे? – गपाट
विनोद गपाट म्हणाले की, पाटील परिवार भाजपमध्ये येण्यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक निवडून येत होते. “धाराशिवमध्ये शिवसेना-भाजप युती अनेक वर्षांपासून मजबूत आहे. मागील नऊ लोकसभा निवडणुकांपैकी सात निवडणुका युतीने जिंकल्या. डॉ. पाटील आणि मधुकरराव चव्हाण मंत्री असताना जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि पंचायत समित्या युतीच्या ताब्यात होत्या. त्यामुळे विजयाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला नसून ते पक्ष आणि कार्यकर्त्यांचे आहे,” असे त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे सांगितले की, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व अनेक वर्षे राहिले असून, आवश्यक असल्यास त्यासंदर्भातील अधिक पुरावे योग्य वेळी सादर करू.
‘पराभवाच्या भीतीतून भाजपात प्रवेश’
ॲड. व्यंकट गुंड यांनी अर्चना पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत, “पराभवाची भीती आणि सत्तेची लालसा यामुळे पाटील परिवाराने भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्याऐवजी त्यांनी आत्मचिंतन करावे,” असा सल्ला दिला.
त्यांनी १९९७ आणि २०१२ मधील स्थानिक निवडणुकांचा उल्लेख करत, राष्ट्रवादी आणि पाटील परिवाराची मजबूत सत्ता असतानाही त्यांच्या नातेवाईकांचा पराभव भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केला होता, असा दावा केला. “जीवनराव गोरे यांचा सुधाकर गुंड गुरुजी यांनी आणि अमोल पाटोदेकर यांचा रामदास कोळगे यांनी पराभव केला. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची ताकद कमी लेखू नये,” असे ते म्हणाले.
पराभवाचे श्रेयही घ्या
गुंड यांनी पुढे आरोप केला की, “यशाचे श्रेय स्वतः घेता, पण पराभवाचे काय? डॉ. पाटील यांची एकहाती सत्ता असताना तेर ग्रामपंचायतीत पराभव झाला, अमर पाटील यांचाही पराभव झाला. त्यासाठी जबाबदार कोण होते, हे सर्वांना माहिती आहे.”
त्यांनी असा आरोपही केला की, पक्षातीलच काही नेत्यांचा ठरवून पराभव करण्यात आला, जेणेकरून भविष्यात प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाहीत. “टीका करण्यापेक्षा आपल्या चुका आणि वागणुकीत सुधारणा करावी,” असे त्यांनी म्हटले.
लोकसभा पराभवाचा मुद्दा
ॲड. गुंड यांनी लोकसभा निवडणुकांतील पराभवांचाही उल्लेख केला. “डॉ. पाटील, राणाजगजीतसिंह पाटील आणि अर्चना पाटील यांचा लाखो मतांनी पराभव झाला. डॉ. पाटील आणि राणाजगजीतसिंह यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुका लढवल्या तेव्हा भाजप-शिवसेना युतीने त्यांचा पराभव केला. अर्चना पाटील यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला,” असा दावा त्यांनी केला.
त्यांच्या मते, “जनतेने वारंवार नाकारल्यामुळे आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच पाटील परिवाराने भाजपात प्रवेश केला. भाजपमुळेच ते राजकारणात टिकून आहेत, हे सत्य मान्य करावे.”
तेरणा कारखाना आणि ट्रस्टवर आरोप
ॲड. गुंड यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना, तेरणा ट्रस्ट आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासंदर्भातही गंभीर आरोप केले. “शेतकऱ्यांचा कारखाना बुडाला, ट्रस्ट कुटुंबाच्या मालकीचा झाला, मेडिकल कॉलेज नेरुळला गेले. कारखाना उभारण्याच्या नावाखाली निधी गोळा झाला; मात्र प्रत्यक्षात फक्त चिमणी उभी राहिली,” असा आरोप त्यांनी केला.
याउलट, “आम्ही चार-पाच कारखाने उभे करून तरुणांना रोजगार दिला. संस्था बंद पाडणे, आर्थिक गैरव्यवहार करणे आणि पोकळ घोषणा करणे, हे आमचे काम नाही,” असे ते म्हणाले.
‘जुने कार्यकर्ते स्वाभिमानी’
गुंड यांनी शेवटी स्पष्ट केले की, “जुने भाजप कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत; ते कोणाचे लाभार्थी नाहीत. टेंडर, टक्केवारी आणि सत्तेच्या व्यवहारांशी आमचा संबंध नाही. आम्ही पक्षशिस्त पाळली असून, आमची भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापुढे मांडणार आहोत.”
धाराशिव भाजपमधील हा वाद आता केवळ वैयक्तिक टीकेपुरता मर्यादित न राहता, पक्ष संघटन, जुने-नवे नेतृत्व, राजकीय वारसा आणि स्थानिक सत्ताकारण या सर्व मुद्द्यांवर केंद्रित होत असल्याचे चित्र दिसत आहे.
