यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रेल्वे, सिंचन, शिक्षण, वीज, उद्योग आणि शेतकरी हिताशी संबंधित प्रमुख मागण्या गृहमंत्र्यांसमोर मांडल्या.
या बैठकीस महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.
रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी
ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वे प्रकल्पातील तुळजापूर ते सोलापूर या उर्वरित टप्प्याचे तातडीने टेंडर काढून काम सुरू करण्याची मागणी केली. तसेच नांदेड–पनवेल एक्सप्रेसला ढोकी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करावा, लातूर–मुंबई रेल्वेला कळंब रोड स्थानकावर थांबा द्यावा आणि हरंगुळ–हडपसर रेल्वे सेवा पुणे रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारावी, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय विद्यालय व राष्ट्रीय सिंचन प्रकल्प
धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा, अशीही प्रमुख मागणी ओमराजे यांनी केली.
वीज व उद्योग क्षेत्रासाठी विशेष मागण्या
जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक, कृषी आणि नागरी वीज गरजा लक्षात घेऊन नवीन 200 केव्ही ईएचव्ही उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बार्शी टेक्स्टाईल मिल तातडीने पुन्हा सुरू करून तिचे आधुनिकीकरण करण्यात यावे, ज्यामुळे बार्शीसह परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
पीक विमा निकषांमध्ये बदलाची मागणी
प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील ट्रिगर निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रत्यक्ष पीक नुकसान होऊनही अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहत असल्याची बाब ओमराजे यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. स्थानिक स्तरावरील प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची व्यवस्था करावी आणि योजनेत आवश्यक सुधारणा करून कोणताही पात्र शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
सकारात्मक प्रतिसादाचे आश्वासन

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मकपणे ऐकून संबंधित मंत्रालयांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
‘धाराशिवच्या विकासासाठी माझा पाठपुरावा अविरत सुरू राहील. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न कायम राहील,’ असे ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
