‘पक्ष कोणाच्या मालकीचा नाही’; श्रेयवाद, पोकळ घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानावरून टीका
यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव, लातूर आणि बीड विधान परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपचे आमदार बसवराज पाटील यांचा रूपामाता परिवाराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात भाजपातील नाराज गटातील नेत्यांची एकत्र उपस्थिती, कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा आणि श्रेयवादावर झालेली टीका यामुळे कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्या हस्ते बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ॲड. अनिल काळे, ॲड. खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, कोंडाप्पा कोरे, जनता बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे, शिवसेना संघटक सुधीर पाटील, सहसंपर्क प्रमुख सुरज साळुंके, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, भीमाशंकर हासूरे, प्रकाश आष्टे, रामेश्वर शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘ही मैत्री जनतेच्या सेवेसाठी’
सत्काराला उत्तर देताना बसवराज पाटील म्हणाले, “या सत्कारामुळे प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली असून जबाबदारीही वाढली आहे. ही मैत्री केवळ राजकारणासाठी नाही, तर जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी आहे.”
ते पुढे म्हणाले की, ३५ वर्षांपासून पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. “आम्हाला सन्मानाने वागवले, हेच आमचे भाग्य आहे. मनाचा मोठेपणा असल्यामुळेच भाजप देशातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे,” असे त्यांनी नमूद केले. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
‘भाजप कोण्या एका कुटुंबाचा पक्ष नाही’
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर भर देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भाजप हा कोण्या एका कुटुंबाच्या मालकीचा पक्ष नाही. शाखाध्यक्षापासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत प्रत्येकाला ठराविक कालावधीनंतर पद सोडावे लागते. पक्षाची सूत्रे एका व्यक्तीकडे राहू नयेत, हीच भाजपची परंपरा आहे.”
बसवराज पाटील यांच्या रूपाने भाजपाला शांत, संयमी, अनुभवी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी श्रेयवादाचे राजकारण केले नाही’
ठाकूर यांनी आपल्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा उल्लेख करताना तुळजापूर रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, नीरा-भीमा बोगदा, टेक्स्टाईल पार्क यांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.
ते म्हणाले, “मी कधीही श्रेयवादाचे राजकारण केले नाही. ज्यांनी श्रेय घेतले, त्यांनी केलेले कष्टही जनतेसमोर मांडावेत.” कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी ७ टीएमसी पाणी आणून दाखवण्याचे आव्हानही त्यांनी केले.
‘हम करे सो कायदा चालणार नाही’
खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत पक्षातील काही प्रवृत्तीवर अप्रत्यक्ष टीका केली.
“आपण दुसऱ्याला सन्मान दिला तरच आपल्यालाही सन्मान मिळतो. मागून सन्मान मिळत नाही; त्यासाठी झिजावे लागते. ‘हम करे सो कायदा, मीच मालक’ ही वृत्ती चालणार नाही आणि चालूही देऊ नये,” असे ते म्हणाले.
बसवराज पाटील यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा देताना त्यांनी श्रेयवादावरही टीका केली. “श्रेय जरूर घ्या, पण त्यासाठी केलेले कष्टही सांगा. दुसऱ्याचे श्रेय घेणाऱ्यांना जनता कंटाळली आहे,” असे ते म्हणाले.
पिकविमा, डीपी आणि विकासकामांवर भाष्य
ओमराजे यांनी शेतकऱ्यांच्या वीज डीपी, पिकविमा आणि अतिवृष्टीच्या निकषांवरही भाष्य केले. “१४ मंडळांना पिकविमा मिळाला नाही. ट्रिगरचा समावेश झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ दिले नाही; पण तेच मंत्री होतील’
ॲड. व्यंकटराव गुंड यांनी बसवराज पाटील यांच्या संयमी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देणाऱ्या नेतृत्वाचे कौतुक केले. “काहींनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ दिले नाही; पण तेच पुढे मंत्री होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘३५ वर्षे संघर्ष करणाऱ्यांना सावली नाही’
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनीही कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केला. “३५ वर्षे वादळ-वाऱ्यात पक्षासाठी काम करणाऱ्यांना आज सावली मिळत नाही. मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष उभा आहे,” असे ते म्हणाले.
या नागरी सत्कार सोहळ्यात बसवराज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा, पक्षातील एकीची गरज आणि श्रेयवादाविरोधातील भूमिका यावर एकमुखी संदेश दिल्याने कार्यक्रमाला विशेष राजकीय रंग चढल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
