ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉक्टरांची भूमिका संशयास्पद; दोन जणांवर गुन्हा दाखल, तपासाचे चक्रे वेगाने
यशश्री अपडेट्स|धाराशिव (प्रतिनिधी): एकच वाहन आणि एकच मालक असताना वेगवेगळ्या ठिकाणी खोटे अपघात झाल्याचे दाखवून नामांकित विमा कंपन्यांना लाखो-कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रत्येक अपघातानंतर जखमींवर उमरग्यातील ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ येथेच उपचार झाल्याचे दाखवण्यात आल्याने हे रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
नेमका प्रकार काय?
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील ‘मोटार अपघात दावा प्राधिकरणा’मध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील भिमराव गुणवंत काळे यांनी एक दावा दाखल केला होता. त्यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद केले होते की, आळंद ते उमरगा प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीने (क्र. MH 25 W 6495) त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातात डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे सांगत, त्यांनी वाहनाचा मालक युवराज शिवलिंगप्पा कारभारी (रा. खजुरी, ता. आळंद, जि. कलबुर्गी) आणि ‘बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी’कडून भरपाई मिळण्यासाठी दावा ठोकला होता.
लीगल टीमच्या चौकशीत ‘मास्टरमाइंड’ उघड!
बजाज जनरल इन्शुरन्सच्या लीगल टीमने या दाव्याची अंतर्गत सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या:
- एकाच दुचाकीवर अनेक गुन्हे: संशयित युवराज कारभारी याच्या नावावर असलेल्या MH 25 W 6495 याच एका दुचाकीवरून उमरगा पोलीस ठाण्यात २ तर आळंद पोलीस ठाण्यात १ असे वेगवेगळे अपघाताचे गुन्हे दाखल आहेत.
- दुसऱ्या दाव्यातही तीच गाडी: ‘आकाश घोटाळे’ यांनी दाखल केलेल्या एका दुसऱ्या दाव्यात (दावा क्र. २४६/२०२४) देखील याच युवराज कारभारी आणि याच दुचाकीचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
- १०-१० क्लेमचा बनाव: आणखी एका तपासात समोर आले की, रमेश करसप्पा शेरी याच्या नावावर असलेल्या चारचाकी (KA 28 M 2780) आणि दुचाकी (KA 32 EN 4684) या वाहनांवर वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे तब्बल १०-१० विमा क्लेम (दावे) दाखल करण्यात आले आहेत. यातील २ दावे एकट्या बजाज कंपनीकडे आहेत.
‘ओम हॉस्पिटल’चे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र?
या संपूर्ण घोटाळ्यात सर्वात मोठा संशय उमरग्यातील **’ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’**वर व्यक्त केला जात आहे. दरवेळी वेगवेगळ्या व्यक्तींचा अपघात झाल्याचे दाखवले गेले असले, तरी प्रत्येक वेळी जखमीवर फक्त आणि फक्त याच रुग्णालयात उपचार झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.
त्यामुळे रुग्णालयाचे प्रशासन आणि डॉक्टर या विमा घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये थेट सहभागी असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयाने आजपर्यंत अशी किती बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे (Medical Certificates) आणि केसेस दाखवून विमा कंपन्यांची फसवणूक केली आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या फसवणूक प्रकरणी बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचे ब्रांच ऑपरेशन्स सर्व्हिस मॅनेजर सोपान बिरादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात युवराज शिवलिंगप्पा कारभारी आणि रमेश करसप्पा शेरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३६(३), ३४०(२), ३१८(१) आणि ३(५) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या संपूर्ण रॅकेटचा कसून तपास करत असून, लवकरच यात सहभागी असलेल्या डॉक्टर आणि मध्यस्थांचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे.
