- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती
- शिक्षण, आरोग्य, कृषी आणि रोजगारासह ९ प्रमुख क्षेत्रांवर असणार विशेष लक्ष
यशश्री अपडेट्स |धाराशिव (विशेष प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण, सुरक्षित आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियानाचा भव्य शुभारंभ सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर होणार आहे. आगामी पाच वर्षांत जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने आखलेल्या कृती आराखड्याची पहिली पायरी म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
जिल्ह्याच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’
‘व्हिजन २०३०’च्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा, स्थानिक गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून एक दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. केवळ कागदावर योजना न ठेवता ग्रामीण भागातील मूलभूत पायाभूत सुविधा सक्षम करणे, तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणे हा या अभियानाचा मुख्य गाभा आहे.
या आराखड्यात प्रामुख्याने ९ महत्त्वाच्या क्षेत्रांवर व्यापक काम केले जाणार आहे: १. पायाभूत सुविधा: रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्थेचे मजबुतीकरण. २. शिक्षण व तंत्रज्ञान: जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटल शिक्षण. ३. आरोग्य सेवा: ग्रामीण व शहरी भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधांची उपलब्धता. ४. कृषी व सिंचन: शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीतंत्र आणि जलसंधारणाची कामे. ५. रोजगार व उद्योग: स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी. ६. महिला सक्षमीकरण: बचत गट आणि महिला उद्योजकतेला बळ. ७. पर्यटन व संस्कृती: धाराशिवमधील धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा विकास. ८. पर्यावरण संवर्धन: हरित धाराशिव संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण रक्षण. ९. डिजिटल प्रशासन: प्रशासकीय सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करणे.
दिग्गजांची मांदियाळी आणि प्रमुख उपस्थिती
या अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार कमल भगवानराव गोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप बाबुराव सरनाईक उपस्थित राहतील.
तसेच ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चे (MITRA) उपाध्यक्ष तथा आमदार रणाजगजितसिंह पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना रणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
याशिवाय विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, बसवराज पाटील, विक्रम काळे, आमदार कैलास घाडगे-पाटील, डॉ. तानाजी सावंत, प्रवीण स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड आणि धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती पुजार, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकसहभागाचे आवाहन
“हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून धाराशिव जिल्ह्याच्या भविष्याची पायाभरणी आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे.” — प्रियवंदा म्हाडदळकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव)
