यशश्री अपडेट्स | परंडा (प्रतिनिधी):
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे आजी-माजी विद्यार्थी, गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. गजेंद्र रंदील उपस्थित होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे यांच्यासह डॉ. अरुण खर्डे, डॉ. विद्याधर नलवडे, डॉ. संभाजी गाते, डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. विशाल जाधव, डॉ. अक्षय घुमरे, डॉ. राहुल देशमुख, डॉ. अतुल हुंबे आणि डॉ. कृष्णा परभणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी दीपक ओव्हाळ यांनी मराठी विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. कृष्णा लांडगे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त करून महाविद्यालयाचा शैक्षणिक लौकिक वाढवल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश जाधव यांचा सत्कार. त्यांनी दहा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण देशमुख यांनी केले. महाविद्यालयात सकारात्मक, प्रेरणादायी आणि सुसंवादी वातावरण निर्माण व्हावे, गुणवंतांचा सन्मान करून इतरांना प्रेरणा मिळावी तसेच शैक्षणिक व सामाजिक मूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून सत्कारास पात्र ठरण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा, आधुनिक संसाधने आणि विविध उपक्रमांचा प्रभावी वापर करून संस्थेची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही प्राचार्य आणि वरिष्ठ विभागातील प्राध्यापकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी अशा प्रकारचे सन्मान सोहळे संस्थेतील गुणवत्ता, प्रेरणा आणि सामाजिक उत्तरदायित्व अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त केली.
