यशश्री अपडेट्स | भूम (प्रतिनिधी): भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी असलेला हक्काचा पोषण आहार (टेक होम रेशन) चक्क सुट्टीच्या दिवशी बाहेर नेऊन विकण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा काळाबाजार ऐनवेळी उघडकीस आला असून, याप्रकरणी प्रशासनाने संबंधित अंगणवाडी सेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावत २४ तासांत उत्तर मागवले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय सुट्टीच्या दिवशी रचला डाव!
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक १९ जुलै रोजी शासकीय सुट्टीचा फायदा घेत चिंचपूर ढगे येथील अंगणवाडी क्रमांक ५०७ मधील पोषण आहार बाहेर पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. यामध्ये बालकांसाठीचे टेक होम रेशन (THR), गरोदर आणि स्तनदा मातांसह किशोरी मुलींसाठी आलेला शासनाचा धान्यसाठा एका खासगी वाहनात (MH-14 HG-0252) भरून विक्रीसाठी नेला जात होता.
दरम्यान, सुट्टीच्या दिवशी अंगणवाडीतून धान्य बाहेर नेले जात असल्याचे काही सतर्क ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत गाडी अडवली आणि हा प्रकार उघडकीस आणला.
प्रशासनाची धावपळ; घटनास्थळी केला पंचनामा
पोषण आहाराची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळताच बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी तात्काळ चिंचपूर ढगे येथील घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून वाहनातील धान्याचा पंचनामा केला.
या धक्कादायक प्रकारानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी तात्काळ कारवाई करत अंगणवाडी सेविका बायडाबाई साहेबराव शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
७ दिवसांत अहवाल देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीला पुढील ७ दिवसांच्या आत चौकशी अहवाल बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकशी समितीत खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
- पी. बी. मिसाळ (विस्तार अधिकारी, महिला बालविकास)
- आय. एन. महाले (अंगणवाडी पर्यवेक्षिका)
- श्रीराम अनसिंगकर (कनिष्ठ सहाय्यक)
संबंधित सेविकेचा हलगर्जीपणाचा ‘इतिहास’
अंगणवाडी सेविका बायडाबाई साहेबराव शिंदे यांनी अशा प्रकारे शासकीय कामात निष्काळजीपणा किंवा अनियमितता करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आता या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशी अहवालानंतर संबंधित सेविकेवर कोणती कडक कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
