धाराशिव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांसह विविध वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
https://www.tv9marathi.com
https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित गुण ऑनलाईन पाहता येणार असून निकालाची प्रत (प्रिंटआऊट) देखील डाउनलोड करता येणार आहे. तसेच DigiLocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
शाळांना त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल school login द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मंडळाच्या https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार दिनांक ९ मे २०२६ ते शनिवार दिनांक २३ मे २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शुल्क ऑनलाईन पद्धतीने Debit Card, Credit Card, UPI अथवा Net Banking द्वारे भरता येणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. छायाप्रती मिळाल्यानंतर पाच कार्यदिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून अनेक शाळांमध्ये निकाल पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
उद्या लागणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांसह पालकांचीही धाकधूक वाढली
