रस्ते खड्ड्यात, स्वच्छतेचा बोजवारा; सत्ताधारी नगरसेवकाचा मुख्याधिकाऱ्यांना थेट सवाल

यशश्री अपडेट्स: धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव शहरातील कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसोबतच आता सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही कमालीचे हैराण झाले आहेत. धाराशिव नगर परिषदेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अभिजीत पतंगे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना दोन लेखी निवेदने देऊन प्रशासनाची ‘पोलखोल’ केली आहे. शहरातील विदारक परिस्थिती मांडत त्यांनी संबंधित स्वच्छता ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेत सध्या एकहाती सत्ता असताना, सत्ताधारी नगरसेवकानेच हा ‘घरचा आहेर’ दिल्याने पालिकेचे कारभारी आतातरी जागे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदन १: ‘शरद पवार हायस्कूल ते बोंबले हनुमान चौक’ रस्त्याची दुरवस्था

“पावसाळा पूर्व कामे केवळ कागदोपत्रीच दाखवली जात असून प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती बिकट आहे.” – नगरसेवक अभिजीत पतंगे

  • मुख्य समस्या: शरद पवार हायस्कूल ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता पूर्णपणे उखडला असून येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
  • नागरिकांना त्रास: वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे.
  • मागणी: या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच, पावसाळा सुरू असल्याने काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून नागरिकांची गैरसोय टाळावी.

निवेदन २: प्रभाग क्रमांक ६ मधील ‘घाणीचे साम्राज्य’

  • यंत्रणेचा अभाव: प्रभाग क्रमांक ६ मध्ये केवळ १ घंटागाडी आणि २ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रभागासाठी ही यंत्रणा अत्यंत अपुरी आहे.
  • परिणाम: नियमित साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गटारी तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
  • मागणी: प्रभागात आवश्यक ती साधनसामग्री व अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारावर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.

‘लाडक्या’ ठेकेदाराची मनमानी आणि लोकप्रतिनिधींची कोंडी

शहरातील बहुतांश नगरसेवकांची हीच व्यथा आहे, मात्र पतंगे यांनी धाडस दाखवून या प्रश्नांना वाचा फोडली आहे. पालिकेच्या एका ‘लाडक्या’ ठेकेदाराने अनेक कामे अपूर्ण, निकृष्ट दर्जाची आणि नागमोडी करून ठेवली आहेत. या निकृष्ट कामांमुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
दुसरीकडे, वरिष्ठ नेतृत्वाची मर्जी राखण्यासाठी सर्व काही ‘अलबेल’ असल्याचे चित्र रंगवताना स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी तारेवरची कसरत होत आहे. ठेकेदारावरील विशेष मेहेरबानीमुळे नगरसेवकांना ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पालिकेत स्वतःच्याच पक्षाचा नगराध्यक्ष आणि स्वच्छता सभापती असतानाही, पतंगे यांनी प्रशासकीय पातळीवर मुख्याधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे, यावरून त्यांचा राजकीय पदाधिकाऱ्यांपेक्षा प्रशासनावर अधिक विश्वास असल्याचे दिसून येते.

रिल्स आणि बॅनरच्या ‘आभासी’ विश्वापेक्षा जमिनीवरील विकासाची गरज!

धाराशिव शहरात आणि जिल्ह्यात विकासाचे मोठमोठे दावे करणारे बॅनर, सोशल मीडिया रिल्स आणि पीपीटी सादरीकरणे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. अगदी ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून आभासी विकास दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र शहराची स्थिती अत्यंत बिकट आहे. दरवर्षी पावसाळ्यात निसर्ग या तथाकथित विकासाची पोलखोल करतो, तरीही पालिका प्रशासनाचे उपाययोजनांचे गुणक शून्यच आहेत.
थोडक्यात काय तर…
फोटो सेशन, रिल्स आणि मोठ्या शहरांचे केवळ पाहणी दौरे करण्यापलीकडे जाऊन लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *