मांडव्यात मध्यरात्री एलसीबीचा ‘तिरट’ अड्ड्यावर छापा; २२ जुगारी जाळ्यात, १७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

२२ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले; १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

यशश्री अपडेट्स | वाशी :

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवा येथील पारधी पिढी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २२ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले असून, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १५ मोबाईल फोन आणि एका चारचाकी वाहनासह एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईत पकडलेल्या आरोपींपैकी एक जण १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी, तर दुसरा दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे जुगार अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईसोबतच दोन पाहिजे आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोपनीय माहिती मिळताच पोलिसांची हालचाल

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा येथील पारधी पिढी परिसरात मोठ्या प्रमाणावर ‘तिरट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. जुगारामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने कारवाईचे नियोजन करण्यात आले.

सदर परिसर संवेदनशील असल्याने पोलिसांनी खबरदारी घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांसोबत जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) आणि दंगा नियंत्रण पथकाची मदत घेतली. नियोजनबद्ध पद्धतीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला.

पोलिसांचा अचानक छापा; जुगाऱ्यांमध्ये धावपळ

पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचताच अचानक छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी परिसराला घेराव घातल्याने अनेकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

पैशांची पैज लावून तिरट जुगार खेळणाऱ्या २२ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी वाहन जप्त

या कारवाईमध्ये पोलिसांनी २ लाख ४६ हजार ६०० रुपये रोख, जुगाराचे साहित्य, १५ मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

१४ चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी जाळ्यात

या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या संतोष रमेश काळे (रा. मांडवा) याच्याविषयी पोलिसांनी गंभीर माहिती दिली आहे. तो एकूण १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

त्यामुळे मांडवा येथील जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच दोन पाहिजे आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाच्या दृष्टीनेही या कारवाईचे महत्त्व वाढले आहे.

एलसीबीच्या पथकाची नियोजनबद्ध कारवाई

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोह/महेबुब अरब, चापोशि केदार तसेच आरसीएफ आणि क्यूआरटी पथकातील अंमलदार सहभागी झाले.

अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा इशारा

मांडवा येथील पारधी पिढी परिसरात मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नियोजन करून कारवाई केल्याचे या घटनेतून दिसून आले.

दरम्यान, जिल्ह्यातील अवैध जुगार आणि इतर अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!