परंड्यात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; ५७ हजारांचा मुद्देमालासह एकाला अटक

यशश्री अपडेट्स | परंडा

परंडा शहरात अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने धडक कारवाई करत ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गुप्त बातमीदारामार्फत परंडा शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोन पंच व अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांसह परंडा येथील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात सापळा रचला.

बातमीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास शाहीद सादीक शेख (वय ३९, रा. परंडा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित गोळ्या आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये Niteor-10 (Nitrazepam) च्या १५ गोळ्या, Nizascen-10 (Nitrazepam) च्या १० गोळ्या, Anzilum 0.5 (Alprazolam) च्या ९३ गोळ्या तसेच विक्रीसाठी वापरण्यात येणारा विवो कंपनीचा मोबाईल फोन यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५७ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपीला परंडा पोलीस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी सफौ/वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध NDPS कायद्यातील कलम 8(C), 22(A) तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील कलम 18(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलीस अधीक्षक अजीत टिके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंडे आणि ज्योती किर्तीकर यांनी सहभाग घेतला.

हेडलाईन:

परंड्यात ANTF ची धडक कारवाई; नशेच्या ११८ गोळ्या व मोबाईलसह एकाला अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *