यशश्री अपडेट्स | धाराशिव
कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा बहुचर्चित निकाल आता 20 जून रोजी जाहीर होणार आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी तथा राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात ऍम्ब्युलन्समधून दाखल झाले. यावेळी ते व्हीलचेअरवर असून चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा रंगली.
डॉ. पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व आरोपींना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार नऊपैकी आठ आरोपी न्यायालयात उपस्थित होते. तर शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा बिहारमधील सिवान कारागृहात असल्याने प्रत्यक्ष हजर राहू शकला नाही.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 16 जून रोजी निकाल अपेक्षित होता. मात्र निकालपत्रातील काही दुरुस्त्या, न्यायालयीन सुट्टी आणि स्टेनोग्राफरच्या अनुपस्थितीदरम्यानही सुरू असलेले काम यामुळे निकालाला विलंब झाला. तसेच सीबीआयचे वकील नागपूर येथे अन्य एका प्रकरणाच्या कामकाजासाठी गेले असल्याने त्यांनी मुदतवाढीची विनंती केली होती. न्यायालयाने ती मान्य करत निकालाची तारीख 20 जून निश्चित केली.
या सुनावणीवेळी पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजे तसेच समद काझी यांच्या पत्नी व मुलगाही न्यायालयात उपस्थित होते.
आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 20 जून रोजी जाहीर होणाऱ्या या बहुचर्चित निकालाकडे लागले आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील ऍम्ब्युलन्समधून कोर्टात; बहुचर्चित निकालाची तारीख वाढली
