यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
परंडा येथील सुपुत्र, जागतिक दर्जाचे संशोधक आणि शिवाजी विद्यापीठातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॉप ५ टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परंडा शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल भाजप नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दूरध्वनीद्वारे प्रा. डॉ. राशीनकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
प्रा. डॉ. राशीनकर हे शिवाजी विद्यापीठातील आघाडीचे संशोधक असून त्यांनी संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांचे वडील स्वर्गीय शंकरराव राशीनकर हे भूविकास बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक होते, तर मातोश्री स्वर्गीय उमाबाई वडेकर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. शिक्षण व संशोधनाचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या प्रा. राशीनकर यांनी अनेक वेळा सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे.
महिलांमधील स्तनाच्या कर्करोगावर प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी त्यांनी केलेले ‘हायपरथर्मिया चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती’ हे संशोधन विशेष चर्चेत राहिले आहे. या संशोधनाला भारतासह युनायटेड किंगडम (यूके) येथे पेटंट प्राप्त झाले आहे.
याशिवाय पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगांची निर्मिती, कर्करोगविरोधी संयुगांचे संशोधन तसेच जैविकदृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण या क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय विज्ञान क्षेत्राची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा उंचावली असून परंडा शहरासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
