घटस्थापनेने आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; पारंपरिक विधींनी मंदिरात भक्तिमय वातावरण

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना विधी; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

यशश्री अपडेट्स | तुळजापूर :

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवार, आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक घटस्थापना विधीने प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पारंपरिक पूजाविधींमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तुळजापूर नगरीतही नवरात्रोत्सवाची धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा जागर अनुभवायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी आज पहाटे श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने आई तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक परंपरेनुसार हा विधी पार पडला. या सोहळ्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांना अधिकृतपणे सुरुवात झाली.

या वेळी आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकारी, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील मातीला विशेष महत्त्व

श्री तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यात देवीच्या डाव्या बाजूला घटस्थापना केली जाते. या विधीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील माती आणण्याची परंपरा आहे. या मातीला ‘वावरी’ असे म्हटले जाते. त्यामुळे घटस्थापनेचा हा विधी केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून, तो इतिहास, श्रद्धा आणि देवीच्या उपासनेशी जोडलेला आहे.

घटस्थापनेसाठी वापरण्यात येणारा कलश धाकटे तुळजापूर येथील कुंभार कुटुंबीयांकडून आणला जातो. या कलशात गोमुख आणि कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते. जिल्हाधिकारी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहनाचा धार्मिक विधी केला जातो. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा घटकलश सिंहाच्या गाभाऱ्यात आणून विधिपूर्वक प्रतिष्ठापित केला जातो.

शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्यांची परंपरा

घटस्थापनेच्या विधीत सप्तधान्यांनाही विशेष महत्त्व आहे. तुळजापूर येथील शेटे कुटुंबीयांकडून घटस्थापनेसाठी सप्तधान्य दिले जाते. यामध्ये जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका आणि सातू या सात धान्यांचा समावेश असतो. पारंपरिक धार्मिक पद्धतीनुसार या धान्यांचा घटस्थापनेच्या विधीत उपयोग केला जातो.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घटाची स्थापना झाल्यानंतर देवीची पहिली माळ घटावर अर्पण केली जाते. ही माळ नागवेलीच्या पानांची असते. या परंपरेला नवरात्रोत्सवातील विशेष स्थान आहे. प्रत्येक धार्मिक विधी हा ठरलेल्या प्रथेनुसार आणि मंदिरातील परंपरेचे पालन करून पार पाडला जातो.

पाठ, हवन आणि अनुष्ठानांना सुरुवात

घटस्थापनेचा विधी पूर्ण झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणांना पाठ, हवन आणि अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाते. नवरात्र काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व असून, धार्मिक विधी आणि परंपरांच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाते.

आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील लाखो भाविकांची आराध्य देवता असून, शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापनेने सुरू झालेल्या या महोत्सवामुळे तुळजापूरच्या धार्मिक परंपरेला उजाळा मिळाला आहे. श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक विधींच्या संगमातून सुरू झालेला हा नवरात्रोत्सव आगामी दिवसांत देवीच्या आराधनेने आणि धार्मिक कार्यक्रमांनी अधिक उत्साहपूर्ण होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!