यशश्री अपडेट्स | नळदुर्ग
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच भागावरून खाली उडी घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत महिलेचा आणि तिच्या एका चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला असून, दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
मृत महिलेचे नाव अश्विनी तानाजी मोहिते (वय ३०, रा. वंताळा, ता. उमरगा) असे असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी त्या आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावर आल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मोहिते या किल्ल्याच्या उंच तटबंदीच्या परिसरात गेल्या होत्या. त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसह उंच भागावरून खाली उडी घेतली. उंचीवरून खाली पडल्यामुळे चौघांनाही गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. जखमींना तातडीने उपचारासाठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, गंभीर दुखापत झाल्याने अश्विनी मोहिते आणि त्यांच्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
दोन्ही मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे वंताळा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नळदुर्ग पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, महिलेने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांकडून नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार असून, तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील संपूर्ण कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एका आईसह तिच्या चिमुकल्याचा झालेला मृत्यू आणि दोन मुलींची गंभीर प्रकृती यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
