३२ घरफोडीचे गुन्हे उघड; ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते गौरव

धाराशिव | यशश्री अपडेट्स

धाराशिव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल ३२ गुन्हे उघडकीस आणले असून, ४५ लाख ३५ हजार रुपयांचा सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचा १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

आनंदनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ मधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना या कारवाईचा धागा पोलिसांच्या हाती लागला. वारंवार घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके नियुक्त करण्यात आली होती.

पोलिसांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशी व तपासादरम्यान आरोपींकडून विविध ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत एकूण ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या उत्कृष्ट तपास व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कारवाईबद्दल पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले. घरफोडीच्या गुन्ह्यांचा मोठ्या प्रमाणात उलगडा झाल्याने गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!