दिलगिरी, वादावर पडदा; त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला भाजप परिवार – जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

सोशल मीडिया टीमकडून पूर्वपरवानगीशिवाय पोस्ट; भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी

यशश्री अपडेट्स | धाराशिव

भारतीय जनता पक्षातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जुने-नवे पदाधिकारी वादावर अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सविस्तर खुलासा करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त पोस्टबाबत त्यांनी फेसबुकवर भूमिका स्पष्ट करत संबंधित पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगी न घेता अनवधानाने प्रसिद्ध केल्याचे सांगितले. त्या पोस्टमधील शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

अर्चना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘निष्ठावान’ असल्याचा दावा करणाऱ्यांनी मागील ३० वर्षांत भाजपच्या संघटन बांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी नेमके काय योगदान दिले, याचा लेखाजोखा उदाहरणांसह मांडावा, असे खुले आव्हान दिले होते. या पोस्टनंतर धाराशिव भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली. अनेक जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आरोप-प्रत्यारोप सुरू केले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा जिल्हाभर रंगली होती.

वाद वाढत असतानाच अर्चना पाटील यांनी फेसबुकवर नवीन पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, त्या सध्या आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी परदेशात असून, भारत आणि त्या देशातील वेळेतील फरकामुळे त्यांच्या सोशल मीडिया टीमने त्यांची पूर्वपरवानगी न घेता अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केला. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास उशिरा आला. त्या पोस्टमधील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतात.

आपल्या स्पष्टीकरणात त्यांनी भारतीय जनता पक्षाला ‘लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार’ असे संबोधले. धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने एकजुटीच्या बळावर अभूतपूर्व यश मिळवले असून, या यशामुळे काही घटकांकडून पक्षातील एकात्मतेला तडा जावा, असे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रयत्नांना बळी न पडता पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच आपली कायमची प्राथमिकता राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपमध्ये सोशल मीडिया व्यवस्थापनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अर्चना पाटील यांच्या अधिकृत स्टेटसवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध झाल्याने ‘सोशल मीडिया टीम’ची जबाबदारी, नियंत्रण आणि पडताळणी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित पोस्ट नेमकी कोणी तयार केली, ती कोणाच्या सांगण्यावरून प्रसिद्ध झाली आणि त्यामागे काही राजकीय हेतू होता का, याबाबतही पक्षात विविध चर्चा सुरू आहेत.

विशेष म्हणजे, अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर हा मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे पक्षातील गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली. ‘हे सर्व कांड सोशल मीडिया टीमने केले’ असा दावा करण्यात आला असला, तरी अधिकृत खात्यांवर कोणाला प्रवेश होता, पोस्टची जबाबदारी कोणाची होती आणि ती पूर्वतपासणीशिवाय कशी प्रसिद्ध झाली, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजकीय वर्तुळात या प्रकरणाकडे केवळ एका सोशल मीडिया पोस्टच्या चुकीपुरते न पाहता, धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाभोवती निर्माण झालेले संवेदनशील वातावरण आणि संघटनात्मक समन्वयाच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, या घटनेमुळे अर्चना पाटील यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही शोध घेण्याची गरज आहे.

या घडामोडीनंतर जबाबदार लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरील मजकुरावर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. पक्षातील मतभेद सार्वजनिक पातळीवर जाण्याऐवजी संवादातून सोडवणे, कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण कायम ठेवणे आणि संघटनात्मक शिस्त राखणे हीच खरी पक्षाची ताकद असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्चना पाटील यांच्या दिलगिरीच्या पोस्टमुळे सध्या तरी या वादावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत असली, तरी या प्रकरणामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि सोशल मीडिया व्यवस्थापनाचा मुद्दा पुढील काही दिवस चर्चेचा विषय राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!