भूम पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या बदलीची जोरदार मागणी; अन्यथा १४ ऑगस्टपासून ‘भूम तालुका बंद’चा सर्वपक्षीय इशारा

यशश्री अपडेट्स|भूम (प्रतिनिधी): भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या मागणीसाठी परिक्षेत्र संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पोलीस निरीक्षकांची हकालपट्टी न झाल्यास १४ ऑगस्टपासून संपूर्ण भूम तालुका बंद ठेवण्याचा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी दिला आहे.

निवेदनात करण्यात आलेले गंभीर आरोप:

१. धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप:

  • भूमचे ग्रामदैवत श्री अलमप्रभू देवस्थानातील पारंपरिक आरती बंद पाडून गुन्हे दाखल करणे.
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान रोखण्याचा प्रयत्न करणे.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या वेळी समाजमंदिर परिसरात विनाकारण संचारबंदी लावून समाजबांधवांच्या भावना दुखावणे.
  • स्थानिक यात्रेतील व्यापाऱ्यांवर कारवाई करत कार्यक्रम बंद पाडणे.

२. आंदोलक आणि नागरिकांवर खोटे गुन्हे:

  • शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बळीराजावर थेट गुन्हे नोंदवणे.
  • भूम-परांडा रस्त्यावरील गतिरोधक प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणे.
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरच गुन्हे दाखल करणे.

३. अवैध धंद्यांना खतपाणी व भ्रष्टाचाराचा दावा:

  • परिसरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गुटखा, गांजा, गोवंश तस्करी आणि ऑनलाईन जुगार यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याचा दावा.
  • पारधी समाजाच्या कार्यक्रमाच्या नावाने आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप, तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून सामाजिक कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग करून नागरिकांना ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार.
  • खोट्या फिर्यादींच्या आधारे नागरिकांकडून पैशांची वसुली करणे आणि आरोपींना अटक टाळण्यासाठी आर्थिक तडजोड करणे.

४. तपासातील दिरंगाई व अयोग्य वर्तन:

  • चोरीच्या घटनांचा योग्य तपास न करणे आणि गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना पाठीशी घालणे.
  • दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपींना थेट मदत पुरवणे.
  • पोलीस ठाण्यात येणाऱ्या महिला तक्रारदारांशी अयोग्य व चुकीचे वर्तन करणे.

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती व आंदोलनाचा इशारा

पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांची भूम पोलीस ठाण्यातून तात्काळ उचलबांगडी करून त्या ठिकाणी एका निष्पक्ष व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ ऑगस्टपासून भूम तालुका पूर्णपणे बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजयसिंहराजे थोरात, दिलीप शाळू महाराज, नगरसेवक रुपेश शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे, विठ्ठल बागडे, नवनाथ रोकडे, रामराजे कुंभार, गणेश शाळू, रमेश मस्कर, हरिचंद्र, विलास शाळू, संतोष सुपेकर, सिरज मोगल, सुनील वीर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!