यशश्री अपडेट्स परंडा : परंडा नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत जातीय व आक्षेपार्ह अपशब्द वापरल्याचा गंभीर आरोप करत परंडा शहरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही निलंबनात्मक अथवा कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने संतप्त मुस्लिम बांधवांनी शनिवार दि. ०९ मे २०२६ रोजी परंडा शहर बंदची हाक दिली आहे.
यासंदर्भात परंडा व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले असून, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व आस्थापने बंद ठेवून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनावर “समस्त मुस्लिम समाज, परंडा” अशी नोंद असून अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे जातीय अपशब्द वापरले. या घटनेनंतर समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने व्यापारी महासंघाकडे अधिकृत निवेदन देत शहर बंद आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. “जोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे शनिवारी परंडा शहरातील बाजारपेठ, व्यापारी आस्थापने व विविध व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
