ओंकार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित; बोगस उत्पादक कंपन्यांना कायमचे टाळे ठोकण्यासाठी कृषी आयुक्तांना प्रस्ताव.
यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव: काळ्या आईची ओटी भरण्यासाठी आणि खरिपाची पेरणी सुफळ करण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात घाम गाळत आहे. मात्र, ऐन हंगामात बळीराजाच्या याच हतबलतेचा आणि गरजेचा गैरफायदा घेत त्याच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे समोर आला आहे. अणदूर आणि नळदुर्ग येथील **’ओंकार कृषी सेवा केंद्रा’**कडून शेतकऱ्यांच्या माथी चक्क ‘बोगस खत’ मारल्याचा खळबळजनक खुलासा पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून झाला आहे.
कृषी विभागाने जप्त केलेले खताचे नमुने प्रयोगशाळेत पूर्णपणे ‘फेल’ (अपात्र) ठरले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाईचा बडगा उगारत या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, पांढऱ्या मातीची विक्री करून शेतकऱ्यांची कोट्यवधींची लूट करणाऱ्या संबंधित खत उत्पादक कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करण्यासाठी कृषी आयुक्तांकडे कडक शिफारसीचा प्रस्ताव पाठवला आहे.
शेतकऱ्यांची ‘तीक्ष्ण नजर’ अन् मध्यरात्री पडली धाड!
या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश जागृत शेतकऱ्यांमुळेच होऊ शकला. नळदुर्ग जवळील हिप्परगा व दिंडेगाव येथील शेतकरी सतीश बनसोडे आणि सुरज बाचाटे यांनी अणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रातून ‘शेतकरी राजा’ नावाच्या खताची सुमारे ३५० पोती खरेदी केली होती. मात्र, हे खत वाहनांमध्ये भरत असतानाच शेतकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून खताचा संशयास्पद दर्जा सुटला नाही. खताचा विचित्र रंग आणि पोत पाहून शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संशयाची पाल चुकचुकली.
व्यापाऱ्याकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, शेतकऱ्यांनी कोणताही वेळ न घालवता थेट खताने भरलेली वाहने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर हा प्रकार मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस बंदोबस्तात धाड टाकण्याचे आदेश दिले. कारवाईचा तपशीलमुख्य मुद्दे कारवाईची वेळ१८ जून, मध्यरात्री संयुक्त पथककृषी विभाग, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्त कारवाईचे ठिकाणअणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्र व गोदामावर छापा जप्त साठातब्बल १७ प्रकारच्या खताच्या १,१६८ बॅगा सील
या छाप्यानंतर कृषी पथकाने जप्त खतांचे तीन वेगवेगळे नमुने तातडीने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. हा अहवाल नुकताच प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यात हे खत पूर्णपणे निकृष्ट आणि शेतीसाठी ‘अपात्र’ असल्याचे सिद्ध झाले आहे.
₹३०० ची माती ₹१५०० ला; खताच्या नावाखाली ५ पट मोठी लूट!
या बोगस खत घोटाळ्यातून शेतकऱ्यांच्या लुटीचा अत्यंत संतापजनक आकडा समोर आला आहे. बाजारभाव केवळ ३०० रुपये असलेल्या पांढऱ्या मातीमिश्रित खतासाठी नफेखोर दुकानदारांनी शेतकऱ्यांकडून तब्बल १,५०० रुपये उकळले.
लुटमारीचे गणित: एका खताच्या बॅगमागे बळीराजाची १,२०० रुपयांची थेट फसवणूक झाली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर, हा केवळ एक साधा व्यापार नसून पांढऱ्या मातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना ५ पट अधिक दराने लुटणारे एक मोठे संघटित रॅकेट (माफिया) जिल्ह्यात सक्रिय होते, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
शेतकऱ्यांचा संतप्त सवाल: “शेतकऱ्याला दिसलेली ‘माती’ साहेबांना का दिसली नाही?”
या संपूर्ण प्रकरणामुळे कृषी विभागाच्या ‘नियमित तपासणी’च्या दाव्यांचे वाभाडे निघाले असून त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जे बोगस खत वाहनांमध्ये भरताना सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या केवळ रंगावरून आणि पोतावरून तात्काळ संशयास्पद वाटले, तेच खत हजारो गोण्यांच्या स्वरूपात गोदामात पडून असताना कृषी अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसे सुटले? कृषी विभागाकडून दरमहा किंवा हंगामाच्या सुरुवातीला खत दुकानांची आणि गोदामांची नियमित तपासणी केली जाते, असा दावा केला जातो. मग अधिकाऱ्यांची ही तपासणी केवळ कागदोपत्री आणि एसी केबिनमध्ये बसूनच होते का? असा संतप्त सवाल आता जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत.
बोगस कंपन्यांचे जाळे; परवाने कायमचे रद्द होणार?
अणदूर येथील दुकानाच्या गोडाऊनातून जप्त केलेले खत पश्चिम महाराष्ट्रातील आणि काही साठा नांदेड जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल ‘फेल’ आल्यानंतर कृषी विभागाने या दोन्ही उत्पादक कंपन्यांचे परवाने महाराष्ट्रातून कायमचे रद्द करावेत, अशी शिफारस कृषी आयुक्तांकडे केली आहे.
कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात बोगस खत विक्रेते आणि नफेखोरांचे धाबे दणाणले आहेत. आता या बोगस कंपन्यांवर वरिष्ठ पातळीवरून काय कडक कायदेशीर कारवाई होते आणि गुन्हे दाखल होतात का, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.
