धाराशिवच्या दोन सुपुत्रांची चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री; नागराज मंजुळेंसोबत केली ‘खाशाबा’ चित्रपटाची सहनिर्मिती!

१ जानेवारीला रुपेरी पडद्यावर उलगडणार ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा प्रेरणादायी प्रवास

यशश्री अपडेट्स | धाराशिव: हवा, पाणी आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्ह्याचे सुपुत्र मनोज औदुंबर मोरे आणि प्रताप राजेंद्र गायकवाड यांनी मराठी चित्रपटसृष्टीत व्यावसायिक सहनिर्माते (Co-Producers) म्हणून अत्यंत दमदार पदार्पण केले आहे. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘खाशाबा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली असून, यामुळे धाराशिवचे नाव चित्रपटविश्वात नव्या उंचीवर पोहोचले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे यांच्या मुख्य सहकार्यातून या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच १ जानेवारी रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

मातीतील संघर्षाची आंतरराष्ट्रीय गाथा

हा चित्रपट सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोलेश्वर गावचे सुपुत्र खाशाबा जाधव यांच्या अद्भूत जीवनप्रवासावर प्रकाश टाकतो. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकून भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली होती. मराठी मातीतल्या कुस्ती परंपरेतून घडलेल्या या महान मल्लाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोणत्याही अत्याधुनिक सुविधांशिवाय जागतिक रंगमंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला होता. त्यांचा हा ऐतिहासिक पराक्रम आणि त्यामागील संघर्ष ‘खाशाबा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

वडिलांच्या तालमीतून ऑलिम्पिकच्या आखाड्यापर्यंत

खाशाबा जाधव यांना कुस्तीचे प्राथमिक धडे त्यांचे वडील आणि त्या काळातील नामांकित मल्ल दादासाहेब जाधव यांच्याकडून लाभले होते. घरची बेताची परिस्थिती आणि सरकारी अनास्थेचा सामना करत केवळ कठोर परिश्रम, जिद्द आणि देशासाठी काहीतरी करण्याची ज्वलंत इच्छा या बळावर त्यांनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. चित्रपटात हा संपूर्ण प्रवास अत्यंत वास्तववादी आणि भावस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे.

धाराशिवकरांकडून कौतुकाचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करत मनोज मोरे आणि प्रताप गायकवाड यांनी निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड न करता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. धाराशिवच्या दोन तरुणांनी थेट ऑलिम्पिकवीराच्या बायोpicची सहनिर्मिती करून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. १ जानेवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट केवळ कुस्ती शौकिनांसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

Leave a Reply